
वडगांव निंबाळकर पोलिसांकडून दारूचा साठा जप्त
सोमेश्वरनगर : करंजेपुल ता. बारामती या ठिकाणी विदेशी दारूचा साठा गुरुवार दि. ९ रोजी सोरटेवाडी नजीक गावाच्या हद्दीत वडगाव निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून १ हजार ९५० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली.
यावेळी रमेश व्यंकट पवार यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजेपुल येथील निरा डाव्या कालव्याच्या लगत एका पतसंस्थेच्या पाठीमागे विहिरी लगत मकेच्या शेतात दारूचा काळा बाजार चालू असल्याची पोलिसांना कल्पना मिळताच यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून १५ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार भोई आणि पोलीस जमादार लोहकरे यांनी ही कारवाई केली.
१६ दिवसात १ हजार ९६५ गुन्ह्यांची नोंद तर ४ कोटी ६९ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च ते दि. ८ एप्रिल २०२० या कालावधीत एकूण १६ दिवसात १ हजार ९६५ गुन्ह्यांची नोंद तर ४ कोटी ६९ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच ८० वाहने जप्त करण्यात आली असून ७५६ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
दि. ८ एप्रिल २०२० रोजी एका दिवसात २१२ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. अवैध मद्य वाहतूक करणारी १७ वाहने जप्त करण्यात आली असून ९५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. ४२ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.