बारामती तालुक्यात गोजुबावी येथे सापडला कोरोनाचा रुग्ण
तालुक्यातील मोढवे पाठोपाठ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याची प्रक्रिया सुरूच असून आज गोजुबावी येथील एका भंगार विक्रेत्यास कोरोनाची लागण झाली.
हा भंगार विक्रेता दौंड येथे राहतो, मात्र त्याचे आई-वडील गोजुबावी येथे राहतात. तो आई-वडिलांना भेटण्यासाठी 20 जून रोजी गोजूबावी येथे आला. त्यावेळी त्याला त्रास होत होता, मात्र तो एक दिवस घरीच राहिल्यानंतर सोमवारी 22 जून रोजी रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाला. या भंगार विक्रेत्यास घशातील खवखव ताप व सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्याच्या घशातील स्रावाचा नमुना घेतल्यानंतर त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
दौंड येथे सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण आढळत असल्याने तेथील एखाद्या रुग्णाच्या संपर्कात हा आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मोढवे येथील दोन मुलींच्या संपर्कातील आजी-आजोबा व इतर नातेवाईकांचे कोरोनाचे चाचणीसाठी घेतलेले नमुने निगेटिव्ह आल्याने मोढवेकरांना दिलासा मिळाला आहे. या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दुसरीकडे बरेचसे रुग्ण हे उपचाराच्या निमित्ताने बारामतीत येत आहेत, त्यांना त्रास होतो आहे याची त्यांना कल्पना असते, परंतु ते सांगत नाहीत तर अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास व त्यांना बारामतीत उपचार घ्यायचा असल्यास त्यांनी थेट रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे, घरी न जाता त्यांनी थेट उपचारासाठी दाखल झाल्यास कोरोनाला रोखता येईल तसेच संसर्गही रोखता येईल असे डॉक्टर मनोज खोमणे यांनी आवाहन केले आहे.