
सुपेपाठोपाठ पणदरे ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल
Thursday, January 28, 2021
Edit
बारामती तालुक्यातील सुपे येथील सरपंच स्वाती अनिल हिरवे यांच्या विरोधात बुधवारी ( दि. २७ ) दुपारी ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांच्या समोर दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या २ फेब्रुवारीला आहे त्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्त करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
येथील सरपंच स्वाती हिरवे असुन सर्वस्वी कारभार पतीराज पहात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. तसेच मासिक मिटींगनंतर काही विषय परस्पर प्रोसेडींगवर घेतले जातात. ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा विषय मागितला असता सरपंच यांचे पतीकडुन धमकी दिली जाते. आम्ही सदस्यांनी घेतलेले विकास कामाचे निर्णय विचारात घेतले जात नाहीत. सरपंच यांच्या बरोबर विकासासाठी चर्चा करण्यासाठी गेलो असता, सरपंच म्हणतात की जे काही चर्चा असेल ती माझ्या पती सोबत करावी. तेच सर्वस्वी निर्णय घेतील असे सरपंच सांगत असल्याने सदस्यांची कुचंबणा होत होती. तसेच येथील कोणत्याच सदस्याला विश्वासात न घेता कामकाज सुरु असल्याने सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
तसेच तालुक्यातील पणदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी संभाजीराव जगताप यांच्या विरोधात गुरुवारी ( दि. 28 ) रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांच्या समोर सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.
सरपंच मनमानी कारभार करतात, सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करतात, सरपंच यांचेवर सदस्यांचा विश्वास राहीला नाही त्यामुळे सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.