
“कोरोना संकट काळात ‘पुणे विभागाला’ आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचा आधार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ६७ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटरचे लोकार्पण”
पुणे-आपल्या यशस्वी उद्योजकतेलाच समाजकार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यातील सातत्य सीईओ व आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमीटेडने कायम राखलेले आहे. याच दृष्टीकोनातून कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीतही बारामती अॅग्रो लिमीटेडकडून हा पायंडा सुरुच आहे. याचाच एक भाग म्हणून आ. रोहित पवारांतर्फे बारामती अॅग्रोचा माध्यमातून पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांकरिता ६७ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज शुक्रवारी पुणे विधानभवन येथे सुपूर्द करण्यात आली.
नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आ.रोहित पवार सतत कार्यरत आहेत. मात्र हे प्रय़त्न केवळ आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता राज्यस्तरावरही आ. रोहित पवार विविध प्रयत्न करत आहेत. सद्य परिस्थितीत रुग्णांचा वाढता आकडा आणि निर्माण झालेला ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन बारामती अॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून पुणे महानगरपालिकेसाठी २७ व पुणे विभागीय आयुक्तालयाकरिता ४० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पुरवण्यात येणा-या या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरमुळे सद्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी ऑक्सीजनची काही प्रमाणात गरज भागवण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीत आ. रोहित पवारांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते.
पुणे विधानभवन येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. चेतन तुपे, आ. सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष महेश हांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पुणे विभागीय आयुक्तालयाचे व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
“राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. दरम्यान एक लोकप्रतिनिधी म्हणून इतर उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढण्याच्या दृष्टीकोनातून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी जपत या सकंटमय परिस्थितीत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे देण्यात येत आहेत.”
-आ. रोहित पवार
(सीईओ- बारामती अॅग्रो लिमीटेड)