-->
को-२६५ या ऊसाची नोंद घ्या! अन्यथा कारखान्यांना गाळप परवाना नाही, साखर आयुक्तालयाचा इशारा

को-२६५ या ऊसाची नोंद घ्या! अन्यथा कारखान्यांना गाळप परवाना नाही, साखर आयुक्तालयाचा इशारा

बारामती - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) प्रमाणित केलेली को-२६५ या ऊस जातीची नोंद जे साखर कारखाने घेणार नाहीत. त्या साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना दिला जाणार नसल्याचे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. ऊस नोंदी घेण्यास काही सहकारी व खासगी कारखान्यांचा नकार येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींवर आयुक्तालयाने ठोस भूमिका घेत कारखान्यांना इशारा दिला आहे.


आयुक्तालयातील साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सर्व सहकारी व खासगी कारखान्यांना या बाबत पत्राद्वारे सूचना दिलेल्या आहेत.

आयुक्तालयाने को-२६५ या जातीच्या उसाच्या नोंदी घेण्याबाबत व गाळप करण्याबाबत यापूर्वी १६ नोव्हेंबर २०१८ रोजी सर्व कारखान्यांना सूचना दिलेल्या होत्या. तरीही काही कारखाने नोंदी घेणे नाकारत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असून संबंधित कारखान्यांची ही कृती शासन धोरणाविरुध्द असल्याचे ही पत्रात म्हटले आहे.

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या को-२६५ या ऊस जातीच्या लागवडीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. या ऊस जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून व्हीएसआयने या ऊसाचे वाण लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी को- २६५ या ऊस जातीची नोंद घ्यावी. अन्यथा त्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल, असेही शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेली १० ते ११ वर्षे को-२६५ या ऊस जातीची लागवड शेतकऱ्यांकडून होऊन ती वाढत आहे. कारखान्याकडून ऊस लागवड ते तोडणी हंगामाचे नियोजन उत्तमरित्या करुन गाळप हंगाम यशस्वी केला जातो. चालू हंगाम २०२१-२१ मध्ये ११.३९ लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले. त्यामध्ये तब्बल ८० टक्के ऊस हा को-२६५ जातीचा आहे. तर ११.३९ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. या जातीची हेक्टरी ऊस उत्पादकता सुमारे १०० ते ११० टनाइतकी आहे.

- पुरुषोत्तम जगताप, चेअरमन, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article