बारामतीत आणखी दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; आकडा 6 वर
शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याच्या दोन नातवंडांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. या मुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे
काल कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांची टेस्ट करण्यात आली होती त्यापैकी 9 जणांचे रिपोर्ट काल आले होते त्या 9 पैकी 2 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आज राहिलेल्या 3 जनांचा रिपोर्ट आला असून त्यातील 2 जण पॉझिटिव्ह आहेत.
बारामती शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याच्या दोन नातवंडांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. या मुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे. समर्थनगरमधील ज्या भाजीविक्रेत्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या सून व मुलालाही कोरोना झाला होता. आता त्याच्या अनुक्रमे एक व आठ वर्षांच्या दोन नातवंडे असलेल्या मुलींनाही कोरोन पॉझिटीव्ह आला आहे.
या मुळे आता प्रशासनाने समर्थनगर परिसरावरच लक्ष केंद्रीत केले असून ही लहान मुले कोणाच्या संपर्कात आली होती, त्यांच्याशी आणखी काही लहान मुले खेळत होती का, तसेच या भागातील काही मोठ्या व्यक्तींनी या लहान मुलांना खेळवले होते काय याचा शोध सुरु झाला आहे. बारामतीतील पहिला रुग्ण भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटी समोरील त्रिमूर्तीनगर येथे रिक्षाचालक सापडला होता. त्या नंतर भाजीविक्रेत्या कुटुंबातील एका ज्येष्ठाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्याच कुटुंबातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी केला बंदोबस्त घट्ट
पोलिसांनी या भागातील बंदोबस्त अधिक घट्ट केला असून कोणालाही विनाकारण पोलिस रस्त्यावर येऊ देत नाहीत. या भागातील लोकांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असे आवाहन प्रशासनाने केले असून आता अधिक कठोर निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बारामतीतील भाजी, फळे, मटण, चिकन व मासळी विक्रीवर या पूर्वीच बंदी आणलेली असून आता रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही कठोर उपाय होतील, अशी चिन्हे आहेत.
बारामतीकर अद्याप गंभीर नाहीत
शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली तरीही लोक सर्रास घराबाहेर फिरत आहेत. लॉकडाऊन असले तरी रस्त्यांवरील दुचाकींची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक जण पोलिसांची नजर चुकवून व ज्या गल्लीत पोलिस बंदोबस्त नाही, अशा गल्ल्यांतून सर्रास रस्त्यांवर फिरुन मजा बघत आहेत.
पोलिसांनी अधिक कुमक मागवून बंदोबस्त ठेवलेला असला तरी ज्या भागात बंदोबस्त नाही अशा भागात किराणा, औषध, दवाखाना अशी कारणे सांगून लोक बिनधास्त फिरत आहेत. मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलाही लोक बिनधास्त फिरत असल्याने लॉकडाऊन निरर्थक ठरु लागले आहे.