केंद्रीय पथकाची बारामतीला पुन्हा एकदा भेट
बारामती : केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी (दि. 30) बारामतीला भेट दिली. येथे कोरोनाला रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या बारामती पॅटर्नची या पथकाने माहिती घेतली. या पथकाने शहरात सरप्राईज व्हिजिट केली. केंद्राने दिलेल्या निर्देशाच्या बारामतीने एक पाऊल पुढे टाकले असून येथील काम समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया पथकाचे प्रमुख डाॅ. ए. के. बडगाईले यांनी दिली.
या पथकामध्ये डॉ. ए. के. बडगाईले, डॉ. सागर बोरकर, डॉ.अंशु गुप्ता व डॉ. व्ही.रंधवा यांचा समावेश होता. पथकाने अचानक भेट दिल्याने बारामतीत प्रशासनाची काहीशी धावपळ उडाली. परंतु, रोजच्या प्रमाणेच बारामती पॅटर्नचे काम सुरु असल्याने कोणतीही वेगळी तयारी बारामतीला करावी लागली नाही.
शहरातील देसाई ईस्टेट भागात त्यांनी पाहणी केली. अक्षय कम्युनिटी हाॅलमध्ये त्यांनी कोरोना स्वयंसेवकांशी चर्चा केली. केंद्र सरकारने कोविड-19 संबंधी घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे बारामतीत काम होत आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी घरपोच किराणा, दूध, भाजीपाला, मांस पुरवले जात आहे. बारामती पॅटर्नमधील या बाबी निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे उदगार या पथकाने काढले.
त्यानंतर येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जात तेथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 च्या आयसोशलेशन सेंटरची पाहणी केली. त्यांच्यासोबत यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल काळभोर, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज खोमणे, डाॅ. सदानंद काळे आदी उपस्थित होते.