बारामती नगरपालिकेची ऐतिहासिक कमान जमीनदोस्त
बारामती : गेल्या 50 वर्षांपासून बारामतीच्या अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असलेली बारामती नगरपालिकेची कमान काल रात्री अचानकच नगरपालिकेने जमीनदोस्त केली.
सन 1967 मध्ये बारामती नगरपालिकेच्या इमारतीबाहेर या कमानीची निर्मिती तत्कालिन नगराध्यक्ष जयराम पांडुरंग सातव व उपनगराध्यक्ष माणिकलाल तुळजाराम शहा (वाघोलीकर) यांच्या कारकिर्दीत केली होती. त्या काळी ही कमान उभारण्यास अवघे आठ हजार रुपये लागले होते.
बारामतीचा कोणताही संदर्भ आल्यानंतर दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे यायच्या. त्यात भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ व बारामती नगरपालिकेची कमान. बारामतीची ओळख असलेली आणि असंख्य ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार असलेली ही कमान काल रात्री पाडून टाकली गेली.
आज सकाळी बारामतीकर घराबाहेर पडल्यानंतरच ही कमान पाडून टाकल्याचे पुढे आले. बारामतीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू होती. अनेकदा बारामतीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडून मुलाखती घेण्यासाठी व बारामतीची ओळख ठळकपणे अधोरेखीत होण्यासाठी या कमानीचाच वापर केला जायचा. आता मात्र ही कमान इतिहास बनून राहणार आहे.