
बारामती ; ग्रामीण भागात अनेक शहरी नागरिक, प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे
बारामती | संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. याच पार्श्वभूमीवर बारामती ग्रामीण भागात प्रशासन सज्ज आहे. मात्र शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांना शहरी भागातून आलेले प्रवासी व नागरिक सहकार्य करत नाहीत. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष अद्यापही रिकामेच आहेत. अनेकांनी प्रशासनाला ही माहितीच दिली नसल्याने पुढील काळात हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हजारोंच्या संख्येने शहरी भागातील नागरिक हे खेड्यात आल्याचे वास्तव आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देऊन अशा नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करणे आवश्यक आहे.
यापैकी अनेक जणांची घरातच सुविधा असल्याने त्यांनी स्वतंत्र रहावे अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. याबाबत मोरगाव ग्रामपंचायतीने याबाबत दवंडी देऊन सुचित केले आहे. परंतु अनेक जण मात्र प्रतिसाद देत नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
बारामतीच्या अनेक गावात याबाबत स्थानिक लोकांकडूनच दक्षता घेतली जाते. तर अनेक ठिकाणी मात्र याबाबत उदासीनता आहे. मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करण्यासाठी प्रशासनाची व्यवस्था आहे. मात्र अद्याप या विलगीकरण कक्षात कुणीच आले नसल्याने प्रश्न चिन्ह आहे. यामुळे प्रशासनाला आता कठोर भूमिका घेत कारवाई करणे गरजेचे आहे.