माळेगावमधील ‘त्या’ वायरमनच्या संपर्कातील १२ जण निगेटिव्ह
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील कोरोनाबाधित वायरमन तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी माळेगाव येथील एका वायरमनला कोरोनाची लागण झाली होती. पुण्यात नोकरीला असलेला हा वायरमन तरुण काही दिवसांपूर्वीच माळेगाव येथे वास्तव्यास आल्या होता. त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
माळेगावमध्ये दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल १२ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात माळेगावकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु नागरीकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.