बारामती तालुक्यात प्रवेश करणाऱ्यांना बसणार चाप; पास असेल तरच प्रवेश; हातावर मारला जाणार क्वारंटाईनचा शिक्का
तालुक्यात सहा ठिकाणी उभारणार चेक पोस्ट : ग्रामीण भागात येणाऱ्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले
बारामती (प्रतिनिधी): लॉकडाऊ शिथिल केल्यामुळे व आपल्या गावी जाण्यास परवानगी दिल्याने सध्या ग्रामीण भागाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा धोका वाढला आहे. बारामती तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी तालुक्यात प्रवेश होत असलेल्या महत्त्वाच्या सहा ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीकडे प्रवेश पास असेल त्या व्यक्तीलाच बारामतीत प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहेत. प्रवेश पास नसेल तर बारामतीत प्रवेश मिळणार नाही.त्यामुळे बारामतीत बिनधास्त प्रवेश करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
तालुक्यातील निंबूत, सांगवी गुंजखीळा, मोरगाव, कुतवळवाडी, सुपा या सहा गावातील मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट उभारली जाणार आहेत. ग्रामीण भागातील करोनाचा धोका वाढल्याने प्रशासनाच्यावतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे-मुंबईसह इतर ठिकाणाहून बारामतीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात गेले आहे. त्यामुळे बारामतीतील ग्रामीण भागात करोनाचा धोका वाढला आहे. पुण्याहून बारामतीतील माळेगाव येथे आलेला महावितरणचा वायरमन करोना संक्रमित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बारामती शहरासह तालुक्यातील अनेक गावात पुणे-मुंबईसह इतर जिल्ह्यातून नागरिक आले आहेत. बारामतीत येणाऱ्यांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण प्रशासनाच्यावतीने आखण्यात आले आहे.
बारामती तालुक्यात प्रवेश होत असलेल्या महत्त्वाच्या सहा गावातील रस्त्यावर चेकपोस्ट उभारण्यात येणार असून त्यामध्ये पोलीस, वैद्यकीय, शिक्षक अथवा ग्रामपंचायत यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
- डॉ. मनोज खोमणे, आरोग्य अधिकारी, बारामती तालुका