-->
बारामती, पुरंदर व दौंडच्या शेतकऱ्यांना दिलासा

बारामती, पुरंदर व दौंडच्या शेतकऱ्यांना दिलासा

सुपे  : जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे शेतीसाठी शनिवारपासून उन्हाळी आवर्तन सोडले आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील योजनेच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. सुमारे ५५२० लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होईल.


उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सोडले होते. आता जनाईचे हे दुसरे आवर्तन सोडल्याची माहिती जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना दौंडचे उपविभागीय अभियंता आर. डी. भुजबळ, शाखा अभियंता रोहन ढमाले यांनी दिली.


ते म्हणाले की, बारामती तालुक्यातील पाच व दौंडमधील चार गावांनी पाणीपट्टीपोटी थकीत व आगाऊ रक्कमा भरल्या आहेत. काही गावांचे पैसे भरून घेण्याचे काम चालू आहे. राहिलेल्या गावांनी पाणीपट्टीची रक्कम तातडीने भरली, तर पाणी वितरणाचे नियोजन करणे सोपे होईल. पुरंदर तालुक्यातील गावांना योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील साठवण तलावात आवश्यक पाणीसाठा झाल्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. अंदाजे किमान वीस दिवस हे आवर्तन चालेल.


टेल टू हेड या न्यायाने पाण्याचे वितरण होणार असून, जनाई योजनेच्या टप्पा क्रमांक एकवरील पंपगृहातील ७७५ अश्वशक्तीचे दोन पंप, तर टप्पा क्रमांक दोनवरील १०५२ अश्वशक्तीचे दोन पंप शनिवारी सकाळी अकरा व एकच्या दरम्यान चालू केले आहेत. हळूहळू रात्री उशिरापर्यंत पूर्ण क्षमतेने म्हणजे टप्पा एकचे पाच व दोनचे सहा पंप चालू करण्यात येतील. पूर्ण पंप चालू झाल्यानंतर ५५२० लिटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचे वितरण होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article