मयुरेश्वर मंदिरास विजयादशमीच्या निमित्ताने रंगीत विद्युत दिव्यांची सुंदर रोषणाई
मोरगाव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगांव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर मंदिरास विजयादशमीच्या निमित्ताने रंगीत विद्युत दिव्यांची सुंदर रोषणाई करण्यात आलेली आहे . हे पाहण्यासाठी गावातल्या गणेशभक्त व ग्रामस्थांनी आज गर्दी केली होती .
राज्यातील सर्वच मंदिरे कोरोना या विषाणूने आजारामुळे बंद आहेत . शासनाकडून विजया दशमीच्या निमित्ताने सीमोल्लंघन पालखी सोहळा काढण्यास परवानगी दिली नाही . मात्र सालाबाद प्रमाणे श्रींच्या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारावर रंग बदणाऱ्या विद्युत माळांची रोषणाई करण्यात आली आहे . नेहमीपेक्षा अधीक आकर्षित रोषणाई करण्यात आली आहे . मंदिराच्या मधील शमीचे झाड , शोभेची झाडे यांवरही रोषणाई करण्यात आली असल्याने मंदिर परीसरात सहस्त्र चंद्रदर्शनाचा आभास होत आहे .
दगडी फरसावरील नंदीच्या मंदिरावरही रंग बदणारे दिवे लावण्यात आले आहेत . मोरगांव येथे दर वर्षी दसरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र ग्रामस्थ व येथील आजी-माजी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन उत्सव रद्द केलेला आहे.उद्या दुपारी मयुरेश्वरास भरजडीत पोषाख व सुवर्णालंकार चढविले जाणार असुन कुठलाही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडुन पोलीस बंदोबस्त पुरवला जाणार आहे. तसेच गणेश भक्तांनी मोरगांव येथे गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच निलेश केदारी यांनी केले आहे .