
बारामती; महावितरणच्या सुमारे 300 कामगारांचा चार महिन्याचा पगार थकला, अनेकांवर उपासमारीची वेळ
कोऱ्हाळे बु- कोरोना संसर्ग वाढत असतानाही वीजपुरवठा सुरळीत रहावा आणि महावितरणची वसुलीही जोरात व्हावी यासाठी काम करत असलेले 'कंत्राटी वीज कर्मचारी' स्वतः मात्र चिंतेत आहेत. गेले पावणेचार महिने तीनशे कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही. यामुळे ऐन कोरोनाकाळत त्यांच्यावर उसनेवारीची आणि उपासमारीची वेळ आली असून काहीजण काम सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. वीजकंपनीच्या नोकरभरती कपातीच्या धोरणामुळे कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरण्याची प्रथा पडलेली आहे. गेले तेरा-चौदा वर्ष केवळ कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारे असंख्य वीजकर्मचारी आहेत. महावितरणमध्ये काहीजण वायरमन, रिडींगमन तर काहीजण ऑपरेटर म्हणून कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. महावितरणच्या बारामती ग्रामीण मंडलाने 'गणेश इंडस्ट्रीयल सर्विसेस' या सेवाक्षेत्रातील कंपनीला बारामती विभागाकरिता मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. डिसेंबर २०२० पासून या कंपनीच्या अखत्यारीत बारामती शहर, बारामती ग्रामीण, इंदापूर, सोमेश्वरनगर या उपविभागांमध्ये ३०३ कर्मचारी काम करत आहेत.
विशेष म्हणजे डिसेंबरपासून कर्मचारी कार्यरत असले तरी महावितरणकडून मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाचा आदेश चक्क १२ मार्चला देण्यात आला. या आदेशानंतर गणेश इंडस्ट्रियलने सर्व कर्मचाऱ्यांचा डिसेंबरचा पगार केला. आदेश आल्याने उरलेले पगार तरी लवकर होतील अशी अपेक्षा बाळगून असलेल्या कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी वीजकंपनीच्या वसुली मोहिमेत आणि कोरोनाकाळात घरी थांबलेल्या लोकांना, उद्योगांना अखंडीत वीजपुरवठा देण्याचेही मोलाचे काम केले आहे. दुसरीकडे वसुली मोहिम सुरू असताना आणि पैसे उपलब्ध असतानाही अधिकारी पातळीवरील लालफितीच्या कारभारामुळे गेले पावणेचार महिने पगार मिळू शकले नाहीत.
जानेवारी महिन्याचा पगार उद्या तर फेब्रुवारी व मार्च चा पगार पुढील महिन्यात देणार - कॉन्ट्रॅक्टदार मानसिंग जाधव
बारामती विभागासाठी मिळालेला कार्या आदेश हा काम सुरू होऊन ३ महिने १२ दिवसांनी म्हणजेच एकूण १०२ दिवसांनी मिळाल्यामुळे कामगारांचा रोश हा कंत्राटदारावर ओडवला गेला आहे. तरीसुद्धा ऑर्डर मिळाल्याबरोबर पहिले वेतन केवळ ८ दिवसांमध्ये डिसेंबरचे वेतन हे दिलेले आहे व दुसरे वेतन 22/4 ला म्हणजे जानेवारी चे वेतन बँकेत दिलेले आहे.
कार्यादेश देण्यात महावितरण बारामती मंडळ व परिमंडळ यांच्याकडून फायनल होण्यास दिरंगाई झाल्यामुळे कंत्राटदार व कंत्राटी कामगारांना त्रास होत आहे तरीसुद्धा एका महिन्यात दोन पगार करण्याची तयारी करून एप्रिल महिन्यामध्ये दोन पगार दिले जातील. एम एस ई बी कडून प्रत्येक महिन्यात पाच तारखेपर्यंत बिलाची मागणी मुख्य कार्यालय मुंबईकडे केली जाते परंतु एप्रिलमध्ये तांत्रिक अडचण व त्या कामातील उदासीनता यामुळे मागणी 20/4/2021ला झाली त्यामुळे कंत्राटदारांना बिलाची रक्कम वेळेत न मिळाल्यामुळे पगारला थोडा थोडा उशीर झाला तरी यापुढे पगार वेळेवर करण्याचा प्रयत्न करू तसेच श्री गणेश सर्व्हिसेस चा कोणी सुपरवायझर नाही आणि कोणत्याही प्रकारची कसलीही रकमेची मागणी केलेली नाही काही कामगारां बरोबर तात्विक वाद झाल्यामुळे विनाकारण असे आरोप केलेले आहेत.