-->
बनावट रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी केली अटक

बनावट रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी केली अटक

कोऱ्हाळे बु- एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे बनावट इंजेक्शन ही अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिवीर इंजेक्‍शनची विक्री  करणारी टोळी हाती लागली.    
     
          या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. चौघे जण या टोळीत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
     
       बारामतीत सर्वत्र रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण झटत असताना दुसरीकडे कोरोना संकटात गैरफायदा घेतला जात आहे. इतके सगळे घडत असताना प्रशासन नेमके काय करत होते, असा सवालही आता उपस्थित होवू लागला आहे.

      बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला. तो एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱ्याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली.    

       पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसीवीरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरत ते  व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते.   
      रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता. दरम्यान, या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article