
खाकीतील माणुसकी: वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात
Tuesday, April 27, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे निराधाराना व जेष्ठ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. हातावरचे पोट असणाऱ्यांना चूल पेटण्यास मदत झाली आहे. यामुळे खाकितील माणुसकीचे परिसरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर झाले. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांचे सहकारी मदतीला धावून आले आहेत.
बारामती तालुक्यात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनची हद्द मोठी आहे. सुमारे 63 गावांचा यात समावेश आहे.या हद्दीत अनेक निराधार व जेष्ठ व्यक्ती (ज्यांना कोणताही आधार नाही) असा समाज राहतो. अनेकांना जगण्याचा प्रश्न पुढे उभा राहिला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यांनी किराणा व अन्य साहित्य खरेदी करत त्यांना त्यांच्या राहत्या घरी पोहोच केले त्यामुळे अनेकांच्या चुली पेटल्या.
सध्या पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. वारंवार आवाहन करूनही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत संसर्ग आटोक्यात यावा यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे गरजूंचे पोट भरण्याचे काम देखील पोलीस करत आहेत.
याअगोदर देखील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पदरमोड करत अनेकांना मदतीचा हात दिला होता.
यावेळी पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे,
सहा. फौ. पोपट जाधव, पो.कॉ.ज्ञानेश्वर सानप, पो. कॉ. गोपाळ जाधव उपस्थित होते.