
बारामतीत आणखी ७ दिवस लॉकडाऊन वाढणार? आजच्या बैठकीत होणार निर्णय
Tuesday, May 11, 2021
Edit
बारामती - बारामतीत लॉकडाउन आदेशाला आज सात दिवस पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीत बारामतीत पुन्हा सात दिवसांसाठी लॉकडाऊन घ्यायचा की नाही यावर चर्चा होणार आहे. बारामतीत रुग्ण संख्या घसरण्यास सुरुवात झाली आहे, मात्र अजूनही रुग्ण संख्या 250 ते 300 च्या दरम्यान राहत असल्याने प्रशासन नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. बारामतीत लॉकडाऊन करतेवेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी रुग्णसंख्या कमी झाली व आटोक्यात आली तर पुढील सात दिवस लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय प्रशासन घेईल असे स्पष्ट केले होते. परंतु अगदी परवा देखील 282 जणांच्या तपासणीत 99 जण कोरोनाबाधित आढळल्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण अजूनही 30 टक्क्यांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यानंतर प्रशासनाला संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला.
मात्र हा निर्णय घेताना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी समाजातील सर्व स्तराचा विचार करून, व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक, छोटे विक्रेते यांचे म्हणणे ऐकून घेत निर्णय जाहीर केला होता, मात्र त्याच वेळी त्यांनी पुढील सात दिवस देखील प्रशासन हा निर्णय कायम ठेऊ शकते याची कल्पना सर्वांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कायम ठेवणार की त्यामध्ये अंशतः बदल करणार, की, फक्त राज्य सरकारचे निर्बंध सुरू ठेवणार याचा निर्णय आज घेणार आहे.
मात्र मागील पाच दिवसांमध्ये 1038 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामध्ये एक दिवस रविवारची सुट्टी होती. त्या दिवशी शासकीय आरटीपीसीआर तपासणी होत नाही. त्यामुळे त्याचा विचार करता, ही रुग्ण संख्या देखील तशी तुलनेने मोठी आहे.
5 मे ते 9 मे दरम्यान एवढे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही संख्यादेखील बारामती तालुक्याच्या दृष्टीने कमी नाही. त्यामुळे अजून एक सात दिवसांचा लॉकडाउन घेण्यावर प्रशासन चर्चा करू शकते. लॉकडाऊनचे अपेक्षित परिणाम मिळत असल्याने रुग्ण संख्या निवळण्यासाठी नागरिकांवरील कठोर निर्बंध यांची आवश्यकता आहे. विशेषतः शहराबरोबरच ग्रामीण भागात या वेळी झालेली रुग्णवाढ ही देखील धोक्याची घंटा आहे.