-->
बारामती; अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीबाईंनी उघडले डोळे

बारामती; अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीबाईंनी उघडले डोळे

वडगाव निंबाळकर : कोरोनाबाधित आजीबाईंची प्रकृती खालावली...शरीर हालचाल करत नव्हते...डोळेही उघडत नाही...त्यामुळे आजींचे निधन झाल्याचे समजून नातेवाइकांना फोन केले. अंत्यसंस्काराची तयारीही झाली. मात्र, अचानक आजीबाईंनी डोळे उघडले...आणि पुन्हा सर्वांना आजी बरी असल्याचे कळवावे लागले.
          मुढाळे (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. १०) हा प्रकार घडला. ७६ वर्षांच्या या आजीबाईंनाना २० दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे आजीबाई विलगीकरणात होत्या. वृद्धापकाळामुळे शरीर प्रकृती साथ देत नव्हती. हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे घरातील सदस्यांनाही सेवा कशी करावी, याबाबत कोडे पडले होते. संपर्कात जावे तर बाधा होईल, अशा भीतीमुळे थोडे अंतर राखून सेवा चालू होती.

        मात्र, गेल्या दोन दिवसांत प्रकृती अधिक खालावली. आजीबाई डोळेसुद्धा उघडत नाहीत, हे पाहून घरातल्या सदस्यांनी बारामतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. गाडी घेऊन जाताना आजीबाईंनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दवाखान्यात ऍडमिट करावे; तर बेड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे गाडीतल्या सदस्यांना वाटले आजीचं निधन झालं. तेथूनच पाहुण्यांना फोन केले. निधन वार्ता कळवली. गाडी घरी आली आणि अंत्यसंस्काराची तयारी झाली. कोरोनाबाधित असल्यामुळे फार कोणी जवळ गेलं नाही. मात्र, आजूबाजूला नातेवाइकांची आर्त हाक ऐकून आजीबाईंनी डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

          कोरोनाच्या संसर्गामुळे एकमेकांना स्पर्श करणे धोक्याचं ठरत असल्याची भावना सर्वांच्या मनात घर करून बसल्याने असे प्रसंग ओढावत आहे. त्यात कोरोनाबाधितांचे अंत्यसंस्कार म्हणजे एक कोडंच झालं आहे. त्यातून लवकर विधी करून मोकळे व्हावं, अशा विचारातून आजीबाईंबाबत घाई अंगलट आली असती. जिवंतपणी सरणावर ठेवण्याच्या तयारीला कोरोनाची भीतीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article