
बारामती: कोरोना प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील गावोगावातील यात्रा उत्सव रद्द
Wednesday, May 19, 2021
Edit
मोरगाव : दि.१९ पासून सुरू होणाऱ्या मुर्टी, तरडोली, मोरगाव या गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना या विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता रद्द केला आहे. यात्रा उत्सव कमिटी मार्फत जनजागृती करून यात्रा रद्द भरणार नसल्याने मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागात दरवर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो . ग्रामीण पट्ट्यामध्ये हा एकमेव मोठा उत्सव असल्याने गावातील तरुण वर्ग उस्फूर्तपणे सहभाग घेत असतात . या दिवशी मंदिरावर तसेच गावात संपूर्ण विद्युतरोषणाई केली जाते . तसेच पाहुण्यांसाठी गोड - तिखट जेवणाचा बेत आवर्जून आखला जातो.
गावामध्ये यात्रेच्या पहील्या दिवशी सायंकाळी जोगेश्वरी व श्री नाथनाथ यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. या विवाहाला हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात
मात्र गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने सार्वजनिक उत्सव संपन्न करण्यास परवानगी नाकारली आहे . यामुळे तरडोली गावात दवंडी व विविध व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे यात्रा उत्सव रद्द झाला असल्याची माहिती तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी दिली आहे. तरडोली व मुर्टी येथील भैरवनाथ यात्रा उत्सवा उद्या दिनांक 19 व 20 रोजी तर मोरगाव येथील भैरवनाथ यात्रा उत्सव 20 व 21 रोजी संपन्न होणार होता. या गावांमध्ये मनोरंजनासाठी संगीत व वगनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते.
.............................................................
सलग दुसऱ्या वर्षी मोरगाव येथे भैरवनाथ यात्रा उत्सव भरणार नाही. कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करावे तसेच श्रींस घरातूनच नैवेद्य दाखवावा
निलेश केदारी : सरपंच ग्रामपंचायत मोरगाव
कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात वाढत चालला आहे. यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी भैरवनाथ मंदिर परिसरात, गावांमध्ये घोळक्याने एकत्र येऊ नये. यात्रेनिमित्ताने गावात पै - पाहुणे बोलवु नयेत
नवनाथ जगदाळे - सरपंच ग्रामपंचायत तरडोली