-->
अंदमानात मान्सून दाखल, १ जूनला केरळ तर १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होणार

अंदमानात मान्सून दाखल, १ जूनला केरळ तर १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होणार

कोऱ्हाळे बु- हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर एण्ट्री केली. 


हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली.  मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला, असं ट्विट होसाळीकर यांनी केलं.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.

मान्सून 1 जूनला केरळमध्ये

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

यंदा मान्सून वेळेत दाखल होणार

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article