
अबब........बारामती- राज्यातील पहिल्या म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिरात आढळले १४ रुग्ण
कोरोना सारख्या वैश्विक महामारीचे थैमान अद्याप सुरूच असताना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. प्रामुख्याने कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन फलटण- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत आज मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत १४ म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले.
कोणतीही भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. दात दुखणे,दातातून फस येणे, तोंडाचा अर्धा भाग दुखणे, टाळूवरती तपकिरी किंवा काळसर डाग पडणे,डोळे लाल होणे.,ताप येणे,नाकातून दुर्गंधी येणे आधी लक्षणे दिसताच. तात्काळ उपचार करून घ्यावेत.
सदर शिबिरात १४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे एमआरआय, सिटीस्कॅन, स्वँब, आधी चाचण्या आजच केल्या जाणार असून काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागणार असेल तर ती शस्त्रक्रिया मी स्वतः करणार असल्याचे इंडियन डेंटल असोसिएशनचे फलटण शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वराज निकम यांनी सांगितले.
महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांवर होणार उपचार…
म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. तसेच बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधून सदर रुग्णांवर सर्व उपचार केले जाणार आहे. सदर आजार गंभीर असून त्याचे उपचारही महागडे आहेत.
या पार्श्वभूमीवर लवकरच एखाद्या शासकीय जागेत ३० बेडचे स्वतंत्र म्युकर मायकोसिसचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे यामध्ये बारामतीमधील शासकीय व खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.