-->
बारामतीला सर्व सुविधा व सेवांच्या बाबतीत देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय; सुप्रिया सुळेंंची बारामतीकरांसाठी खास पोस्ट

बारामतीला सर्व सुविधा व सेवांच्या बाबतीत देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय; सुप्रिया सुळेंंची बारामतीकरांसाठी खास पोस्ट

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंंनी बारामती मतदार संघाचे आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे या सलग तीन वेळा बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्याला दोन वर्ष पुर्ण होण्याचे औचित्य साधून त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहीत सर्व मतदारांचे ऋण व्यक्त केले आहेत.

मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे या लाकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांंपैकी एक आहेत. यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे सलग तिसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची आपण सर्वांनी मला संधी दिली त्याला आज दोन वर्षे पुर्ण झाली.आपण माझ्यावर जो विश्वास, प्रेम आणि आपुलकी दाखविली त्याच्या ऋणातून उतराइ होण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत असते."

"बारामती लोकसभा मतदारसंघ हा माझं कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकजण माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे या मतदारसंघाच्या हिताच्या मुद्यांची केंद्रात तड लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.आपल्या आशीर्वादामुळेच मी हे काम करु शकतेय,आपल्या शुभेच्छांचं बळ माझ्या पाठीशी आहे याची मला जाणीव आहे. "

"आपला बारामती मतदारसंघ सर्व सुविधा व सेवांच्या बाबतीत देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय हे आपणा सर्वांच्या साथीने पाहिलेलं स्वप्न आहे. जे पुर्ण करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीत आहे.आपण दोन वर्षांपुर्वी निवडून दिलेल्या सतराव्या लोकसभेचं कामकाज सुरु झालं व कोरोनाचं थैमान सुरु झालं."

"यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. आपली सर्वांची संपूर्ण शक्ती केवळ या विषाणूचा सामना करण्यात खर्च होत आहे. तरीही आपण पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही महत्वाची कामे करु शकलो आहोत.याशिवाय आरोग्यसेवा अधिकाधिक मजबूत करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करीत आहोत."

"कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी अगदी गावपातळीवरील यंत्रणाही पुर्ण क्षमतांनिशी काम करीत आहेत. या सर्वांचा आढावा मी सातत्याने घेत असते. कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या प्रत्यक्ष भेटींवर मर्यादा आल्या आहेत.पण सोशल माध्यमे व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण भेटत आहोत."

"ही स्थिती लवकरात लवकर आटोक्यात येऊन सर्वांचे आयुष्य पुर्वपदावर येईल आणि सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास आहे."

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article