
बारामती; माळेगावमध्ये मोकाट फिरणाऱ्या ९३ जणांच्या कोरोना चाचणीत ५ जण कोरोना पॉझिटिव्ह
माळेगाव हॉटस्पॉट असला तरी गावात मोकाट फिरणा-यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. यावर नियंत्रण आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाने मोकाट फिरणा-यांची ॲन्टीजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. येथील राजहंस चौकात बॅरेकेट उभारुन निरा- बारामती रस्त्यावर मोकाट फिरणा-यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली
माळेगाव: माळेगाव बुद्रुक ( ता.बारामती)परीसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने माळेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून आज पोलिसांनी मोकाट फिरणा-यांची आरोग्य यंत्रणे मार्फत ॲन्टीजेन तपासणी केली. त्यात त्र्यानव्वपैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून एकजण बाहेरगावातील रुग्ण आहे.
गावातील मुख्य चौकात बसलेल्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
बारामती तालुक्यात सर्वाधिक धोका निर्माण झाला असून माळेगाव हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगाव हॉटस्पॉट असला तरी गावात मोकाट फिरणा-यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. यावर नियंत्रण आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाने मोकाट फिरणा-यांची ॲन्टीजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. येथील राजहंस चौकात बॅरेकेट उभारुन निरा- बारामती रस्त्यावर मोकाट फिरणा-यांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. ही मोहीम तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते, उपनिरीक्षक योगेश लंगुटे यांनी राबविली. यासाठी माळेगाव पोलीस दुरक्षेत्राचे आबा ताकवणे, योगेश चितारे, निखिल जाधव, रावसाहेब गायकवाड, दिपक दराडे यांच्यासह तालुका वाहतुक शाखेच्या पोलिस पथक व होमगार्डचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान लॅब टेक्निशन स्वप्नील खोमणे, गौरव पोमणे, आरोग्य सेवक नवनाथ शिंदे यांनी टेस्ट केली. त्यांना सामाजिक कार्यकर्ते अमित तावरे, इम्तियाज शेख, प्रदिप जाधव, नगरपंचायतीचे सुरेश सावंत, सेहवाग सोनवणे यांनी मदत केली. दरम्यान गावातील मुख्य चौकात बसणा-यांची थेट धरपकड करत त्यांची ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली. संपूर्ण गावात पोलिसांनी धरपकड सत्र सुरु ठेवले होते. त्यामुळे मोकाट फिरणारे भयभीत झाले होते. यापुढे देखील अशाच पद्धतीची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले.
माळेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे मोकाट फिरणारे सुपर स्प्रेडर आहेत. तालुक्यात आरोग्य यंत्रणेची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन केले पाहिजे. लोकांनी सहकार्य केले तरच कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार आहे.
महेश ढवाण- पोलीस निरीक्षक