
कारखान्यांच्या शेअर्सची किंमत ५ हजार रुपयांची वाढणार
Saturday, May 22, 2021
Edit
कोऱ्हाळे बु - सहकारी साखर कारखान्यांचे भागभांडवल वाढवण्यासाठी कारखान्याच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत (शेअर्स) १० हजार रुपयावरून १५ हजार रुपये करण्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी (ता.१८) दिले. सहकारी कारखान्यांचा स्वनिधी कमी पडत असल्याने किंवा कारखाने 'एनपीए'त जात असल्याने कारखान्यांना नवीन प्रकल्प उभारणे अशक्य होत आहे. भांडवल उभारण्याची सहकारी कारखान्यांकडे दुसरी सोय नसल्याने शासनाने सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत वाढवण्याशिवाय पर्याय नाही. किंमत वाढवल्याने वाढीव रक्कम जमा होईल. कारखान्यांचे भागभांडवल वाढून कारखाना सुस्थितीत येईल, कारखान्याला इथेनॉलसह अन्य प्रकल्प उभारणे सोयीस्कर होईल, असे शासनाचे म्हणणे आहे. केंद्रशासनाने इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी राज्यातील १२६ आसवणी प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. यापैकी ६७ साखर कारखाने सहकारी आहेत. या कारखान्यांना विस्तार वाढीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे क्रम प्राप्त आहे, पण भांडवल क्षमता उभारणे शक्य नसल्याने कारखाने हतबल आहेत. शार्टमार्जिन सल्ल्याने कर्ज मिळणे अशक्य आहे. इथेनॉलनिर्मितीसाठी तांत्रिक सुधारणा आवश्यक आहेत, पण या कारखान्याकडे स्वनिधी नाही. या पार्श्वभूमीवर हा आदेश काढला आहे. उपविधित या बाबतचा बदल करावा, असे आदेशात म्हटले आहे.