
बारामती पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर चोरीला गेलेला ट्रक पकडला
बारामती पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला अनेकदा थांबण्यास सांगूनही तो ट्रकचालक दाद देत नव्हता. त्याने ट्रक भरधाव पळवत रस्त्यात येणाऱ्या अनेक दुकानांचा आणि वाहनांचा चुराडा केला आहे. यानंतर बारामती पोलिसांनी या घटनेची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. यानंतर जेजुरी पोलिसांनी मोरगाव रस्त्यावर मधोमध एक अवजड वाहन उभं केलं. पण यावेळी आरोपी ट्रक चालकाने एका सलून दुकानाला आणि हॉटेलला धडक मारून ट्रक पुण्याच्या दिशेनं नेला.
जेजुरीच्या पुढे गेल्यानंतर हायवेला ट्रकचालकाने आणखी स्पीड वाढवला. तसेच पोलिसांनी अनेकदा ट्रक थांबवण्याचं आवाहन केल्यानंतरही त्यानं ट्रक थांबवला नाही. यानंतर बारामती पोलिसांनी जेजुरी पोलिसांच्या मदतीनं जेजुरी सासवड रस्त्यावरील एका अरुंद पुलाच्या ठिकाणी दोन अवजड वाहन उभी करून संपूर्ण रस्ता बंद पाडला.
यावेळी हायवेवरील दोन आडवी वाहनं पाहताच ड्रायव्हरनं ट्रकचा स्पीड कमी केला आणि क्लिनर साईडनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या बारामती पोलिसांनी ट्रक चालकाला मोठ्या शिताफीनं पकडलं आहे. या थरार नाट्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण जेजुरीतील एका सलून दुकासह एका हॉटेलचं बरंच नुकसान झालं आहे. सोबतचं एका पिक अप वाहनाचा चुराडा झाला आहे. बाबा नाझरकर असं आरोपीचं नाव आहे. बारामती पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.