-->
बारामती: रविराज तावरे गोळीबार प्रकरणी सूत्रधार प्रशांत मोरे सह चौघांना अटक, इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्याने चालवली तावरेंवर गोळी

बारामती: रविराज तावरे गोळीबार प्रकरणी सूत्रधार प्रशांत मोरे सह चौघांना अटक, इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्याने चालवली तावरेंवर गोळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रविराज तावरे यांच्यावर काल संध्याकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तालुका पोलिसांनी २४ तासाच्या आत ४ जणांना ताब्यात घेतले.                  यात अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. 
        यातील सूत्रधार प्रशांत मोरे याच्यासह राहूल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टॉम मोरे यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यातील ताब्यात घेतलेल्या  अल्पवयीन मुलाने गोळी घातली. पोलिसांना दिलेल्या माहितीत तो दहावी इयत्तेत शिकत असताना पिस्तूल खरेदी केली अशी माहिती दिली असून पोलिस यासंदर्भात अधिक चौकशी करीत आहेत.काल संध्याकाळी माळेगावच्या संभाजीनगर भागात रविराज तावरे व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे हे त्यांच्या अॉडी गाडीतून आले होते. तेथील वडापाव विक्रीच्या स्टॉलजवळ थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत एक गोळी तावरे यांना छातीवर लागल्याने त्यांना तातडीने बारामतीत खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 
          बारामती हॉस्पिटल येथे तातडीचे उपचार सुरू झाले. त्यानंतर त्यांना गिरीराज हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. तेथे पुण्याहून डॉक्टरांचे पथकही बारामतीत आले होते. या डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
          दरम्यान याप्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली. यामध्ये तावरे यांच्याशी कोणाचे काही वैमनस्य आहे का याची चौकशी केली. या दरम्यान पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी बारामतीत तातडीने भेट दिली व घटनास्थळी पाहणी केली. यानंतर तालुका पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली.
           पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी वेगवेगळी पथके तयार केली व रवाना केली.
          
      घटना घडल्यानंतर अवघ्या सहा तासात ३ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची माहिती आज दुपारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एक आरोपी हा उरूळी कांचन येथे असल्याचे समजले.                      त्यावरून फौजदार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेथे सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत मोरे याचा यात मुख्य सहभाग आहे असे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली.
             प्रशांत मोरे यास मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे आढळून आल्याने पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article