
राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या प्रशांत मोरे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
Tuesday, June 15, 2021
Edit
बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव-पणदरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत मोरे टोळीतील चौघांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई केली. कारवाई झालेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी ही माहिती दिली. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यावेळी उपस्थित होते. प्रशांत पोपटराव मोरे (वय 47, रा. शिवनगर, माळेगाव), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे व राहूल उर्फ रिबल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनाचा कारवाईमध्ये समावेश आहे.
31 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजता रविराज तावरे यांच्यावर माळेगावात मोरे टोळीने गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. तावरे हे पत्नीसह वडापाव घेवून मोटारीकडे येत असताना त्यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी रोहिणी रविराज तावरे यांनी फिर्य़ाद दिली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या रविराज यांच्यावरील गोळीबाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर पाच तासांतच आरोपींना जेरबंद केले होते. पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेदिवशीच पोलिस अधिक्षकांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार अवघ्या 15 दिवसांत या टोळीवर मोक्कातर्गत कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोरे टोळीकडून केला जात होता. त्यातून राजकिय व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने रविराज यांना संपवून दहशत माजविण्यासाठी कट रचून अल्पवयीन मुलामार्फत खूनी हल्ला केला गेला. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम 120 ब आदी कलमांनुसार मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला होता.
या टोळीतील सदस्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. प्रशांत मोरे याच्यावर नऊ, विनोद मोरे याच्यावर सात तर राहूल मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक ढवाण यांनी पोलिस अधिक्षकांमार्फत मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाली.
उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष
माळेगावातील युवा नेते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्यांनी रविराज यांच्यावरील उपचारांसंबंधी वैद्यकिय पथकाला सुचना केल्या होत्या. दुसरीकडे पोलिस प्रशासनाला आरोपींविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले होते.
अवघ्या 15 दिवसांत मोक्का
एखाद्या घटनेनंतर मोक्काचा प्रस्ताव तयार करणे, तो पाठवणे आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांची त्याला मंजूरी मिळणे ही सगळी प्रक्रिया या घटनेत अवघ्या 15 दिवसांत पार पडली. बारामतीत अत्यंत जलद गतीने झालेली ही पहिलीच कारवाई आहे.
- मिलिंद मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक, बारामती विभाग