
ज्युबिलंट कामगार युनियनचे तीन कार्यकारणी सदस्य बडतर्फ; बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, संघटनेची फसवणूक करणे या प्रकारची शिस्तभंग केल्याचा ठपका
बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, संघटनेची फसवणूक करणे या प्रकारची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत ज्युबिलंट कामगार युनियनच्या तीन कार्यकारणी सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.त्यात सुरेश आनंदराव कोरडे, सुनीलदत्त तानाजीराव देशमुख, नंदकुमार वसंतराव निगडे यांचा समावेश आहे. या तिघांचा संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहिला नसल्याचे ज्युबिलंट कामगार यूनियनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
ज्युबिलंट कामगार युनियन ही संघटना गेली अनेक वर्षे मे ज्युबिलंट इनग्रीव्हिया लि, निंबुत (निरा), ता. बारामती, जि. पुणे कंपनीमध्ये कार्यरत आहे. कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये सलोख्याचे व सामंजस्याचे संबंध आहेत.
18 जानेवारी 2019 रोजी 7 कार्यकारणी सदस्य निवडून आले होते. त्यापैकी सुरेश आनंदराव कोरडे, सुनीलदत्त तानाजीराव देशमुख आणि नंदकुमार वसंतराव निगडे यांनी घटनेनुसार कोणत्याही प्रकारचे ठराव न करता पदाधिकाऱ्यांची निवड केली.
संघटनेची तसेच कंपनी आस्थापनेची फसवणूक केली. कमिटीमध्ये 7 सदस्य असताना 3 कार्यकारणी सदस्यांच्या सहमतीने वेतनवाढ कराराच्या बैठका घेतल्या. सहायक कामगार आयुक्त, कामगार कार्यालय, पुणे यांनी इतर कार्यकारणी सदस्यांना घेवून वेतनवाढीचा करार करावा अशी सूचना दिली. त्या सूचनेचे देखील त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे बहुमतातील 4 कार्यकारणी सदस्यांनी या तिघांवर अविश्वास ठराव आणून नवीन कार्यकारणी मधील पदाधिकाऱ्यांची निवड केली.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाचे संघटनेच्या नामफलकावर लावलेले पोस्टर 16 जुलै 21 रोजी बेकायदेशीर जमाव जमवून फाडले. त्यानंतर घटनाबाहय सभा बोलाविली. त्यामुळे संघटनेच्या व कंपनीच्या नावलौकिकास मोठा धक्का पोचविला आहे. कोणताही संबंध न राहिलेल्या सतीश शिवाजीराव काकडे (देशमुख) यांच्या खात्यावर 11 लाख 20 हजार रुपयांचा धनादेश जमा केला. तसेच कार्यकारणी सदस्य नंदकुमार वसंतराव निगडे यांनी स्वतः 9 जून 21 रोजी 1 लाख रुपये काढले. या पैशांचा अपहार केल्याबाबतची तक्रार संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे यांनी 5 जुलै 21 रोजी जेजुरी पोलीस स्टेशन, ता. बारामती, जि. पुणे येथे केली आहे.
त्यामुळे या तिघांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये, म्हणून रितसर 4 ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. 48 तासांत त्या नोटीसीला उत्तर मागितले. परंतु, नोटीसीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांना सर्व आरोप मान्य असल्याचे गृहीत धरून 7 ऑगस्ट रोजी कार्यकारणीवरून बडतर्फीची कारवाई केली. त्यांना संघटनेच्या सदस्यपदावरून देखील काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे ज्युबिलंट कामगार युनियनचा अणि सुरेश आनंदराव कोरडे, सुनीलदत्त तानाजीराव देशमुख, नंदकुमार वसंतराव निगडे यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहिला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.