
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या पोलिस उपनिरीक्षकाची पिंपरी चिंचवडमध्ये कमाल, महागडया गाडयांवर महीना जास्त पैश्यांचा मोबदला देणेचे अमिष दाखवून २५० नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद; आरोपीकडून २ कोटींच्या महागड्या गाड्या हस्तगत
सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडीचा 2014 मध्ये सरपंच होता.
माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या. ती मी भाड्याने लावतो, असे सांगून सरपंच नागरिकांना गाडी घेण्यास भाग पाडत असे. ती गाडी भाड्याने घेतल्यावर काही महिने त्यांना भाडे देत असे. त्यानंतर त्या गाड्यांची इतर जिल्ह्यात जाऊन नागरिकांकडे गहाण ठेवत असे.
ज्याची गाडी आहे तो जुगारात हरला आहे. तो कर्जबाजारी झाल्याने त्याने माझ्याकडे गाडी गहाण ठेवली आहे. आता तो गाडी सोडवून नेईल, असे वाटत नाही. त्यामुळे ती गाडी तुमच्याकडे गहाण ठेवा, असे सांगून तो इतर जिल्ह्यातील नागरिकांना महागडी गाडी देत असे. आलेल्या पैशातून मौजमजा करीत असे. आत्तापर्यंत त्याने खेड तालुक्यातील 55 जण, दौंड-बारामती येथील 20, पिंपरी चिंचवड शहरातील 70 आणि इतर ठिकाणचे नागरिक असे एकूण 200 ते 250 जणांची फसवणूक केली आहे.
आरोपीबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. आरोपीला पोलिसांत अनेक नागरिकांनी तक्रार दिल्याचे समजल्याने तो आरोपी पोलिसांना सतत पोबारा देत होता. तो बीड येथे लपून बसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे व एन. पी.पोटे यांना मिळाली. त्यांनी बीड येथे जाऊन वेशांतर करून २ दिवस दबा धरून बसून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १ कोटी ९६ लाखांच्या २० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु गावचे रहिवासी आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी कोऱ्हाळे बु गावाचे व पोलीस दलाचे नाव रोशन केले आहे.
इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असून आरोपींकडून इतर वाहने जप्त करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
सदर उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपनिरीक्षक साबळे व त्यांच्या टिमला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रशस्तीपत्र व रोख २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.