
बारामती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव तर उपाध्यक्षपदी रोहित घनवट
Monday, December 27, 2021
Edit
: बारामती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन सदाशिव सातव यांची तर उपाध्यक्षपदी रोहित वसंतराव घनवट यांची बिनविरोध निवड पार पडली. बारामती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बॅंकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन भिगवण रस्त्यावरील बॅंकेच्या मुख्य शाखेत करण्यात आले होते. रविवारी (दि. २६) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकांची एक बैठक घेवून मते जाणून घेतली होती.
अखेर अध्यक्षपदी सचिन सदाशिव सातव यांची तर उपाध्यक्षपदी रोहित वसंतराव घनवट यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे त्यांनी ही दोन नावे दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार दोन अर्ज दाखल होत निवडणूक बिनविरोध पार पडली.
सचिन सातव हे बारामती नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते आहेत. नगरपरिषदेतील त्यांची ही तिसरी पिढी आहे. त्यांचे आजोबा स्व. धोंडीबा सातव यांच्यानंतर वडील सदाशिव सातव व आई जयश्री सातव यांनी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. सध्या सातव यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी या ही नगरसेविका आहेत. उद्योजक सचिन सातव यांचा बारामतीतील विविध संस्थांशी निकटचा संबंध आहे.