
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? परीक्षा पध्दत न ठरल्याने विद्यार्थी संभ्रमात
विद्यापीठाची सत्र परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर बरेचसे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने झाल्याने परीक्षाही ऑनलाइन घेण्याची मागणी होत आहे. ऑफलाइन परीक्षांच्या तुलनेत ऑनलाइन परीक्षांच्या निकालात वाढ झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांच्या गुणवत्तेवरून शिक्षण तज्ज्ञांतून सांशकता व्यक्त केली जात आहे.
परीक्षा पद्धत निश्चित करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समिती नियुक्त केली आहे. करोना प्रादुर्भावाची परिस्थिती, राज्यातील अन्य विद्यापीठांच्या परीक्षा पद्धती समजून घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी चर्चा करून ही समिती परीक्षा पद्धतीबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करणार होती. मात्र, समितीची अद्यापही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंतही परीक्षेचे स्वरूप प्रलंबित असल्याने विद्यार्थीही गोंधळात आहेत.
दरम्यान, आठवभरापासून विद्यापीठ कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारले आहेत. त्यामुळे समितीचे पुढचे काम झालेले नाही. या आठवड्यात समितीची बैठक होणार असून, त्यात परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याउलट परीक्षा पद्धत ठरविण्यासाठी विद्यापीठ दिरंगाई का करीत आहे, अशी विचारणा विद्यार्थी संघटनातून होत आहे.