
जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू; ३३ हजार मतदारांचे नाव वगळण्यासाठी अर्ज
नव्याने मतदार नोंदणी, स्थलांतर, तपशीलात दुरुस्ती असे एकूण तीन लाख १६ हजार अर्ज दाखल झाले आहेत. पुढील वर्षी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. १ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत मतदार यादीतून नाव वगळणे, मतदार नोंदणी, स्थलांतर आणि तपशीलात दुरुस्ती यासाठी तीन लाख १६ हजार ८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी मतदार नोंदणीसाठी शहरासह जिल्ह्यातून दोन लाख ५१ हजार २२५ अर्ज, नाव वगळण्यासाठी ३३ हजार ७२ अर्ज, तपशीलात दुरुस्तीसाठी १६ हजार ३८७ अर्ज आणि मतदारसंघात बदल करण्यासाठी १५ हजार ४०१ अर्जांचा समावेश आहे.
दरम्यान, तपशीलात दुरुस्तीसाठी सर्वाधिक ५३३१ अर्ज खडकवासला मतदारसंघातून आले आहेत. त्यापाठोपाठ चिंचवड मतदारसंघातून १३.९१, तर पुरंदर मतदारसंघातून १२०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारसंघ बदलासाठीदेखील खडकवासला मतदारसंघातून सर्वाधिक६११८अर्ज आले आहेत. हडपसरमधून२४१५, तर भोसरी मतदारसंघातून २३९६ अर्ज आले आहेत.
मतदारसंघनिहाय नाव वगळण्यासाठी आलेले अर्ज.
ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी जुन्नरमधून११२६, आंबेगाव ७१०, खेड-आळंदी २६५, शिरूर २४०७, दौंड ८१८६, इंदापूर६७८, बारामती ५२७३, पुरंदर १११०, भोर १३४०आणि मावळ१०३५ असे २२ हजार १३० अर्ज आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी चिंचवडमधून ३४५, पिंपरी ४१५ आणि भोसरीतून १६४असे ९२४ अर्ज आले आहेत. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरीतून १६०, शिवाजीनगर ५५०७, कोथरूड १२०३, खडकवासला ४०७, पर्वती ६३२, हडपसर ३७३, पुणे कॅन्टोन्मेंट१३३४आणि कसबा पेठ ४०२ असे दहा हजार १८ अर्ज आले आहेत.