
चिंताजनक: पुणे जिल्ह्यातील २.७५ लाख लोकांनी अजून घेतला नाही कोरोनाचा एकही डोस; बारामती तालुक्यात ७० हजाराच्या वर उरलेत नागरिक
कोविड-१९ च्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्नशील आहे; मात्र जिल्ह्यातल्या २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही.
राज्यासह जिल्ह्यात जानेवारी २०२१ महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली; पण सुरुवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता; परंतु जुलै- ऑगस्टपासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ऑगस्टनंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला. आतापर्यंत शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करत असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात लोक घेईनात लस
जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी व वेळ प्रसंगी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला होता. मात्र त्यांच्याच बारामती तालुक्यातल्या ७० हजार ६०८ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यानंतर दौंड, इंदापूर, भोर तालुक्यातदेखील अद्याप हजारो लोकांनी लस घेतलेली नाही.
एकही डोस न घेतलेली तालुकानिहाय संख्या-
आंबेगाव - ०, बारामती - ७०,६०८, भोर - ३२, हजार ३३६, दौंड- ५० हजार ७३६, हवेली - ४७ हजार ९६२, इंदापूर- ४७ हजार ९६२, जुन्नर - ७ हजार ८८६, खेड - ०, मावळ- ०, मुळशी - ०, पुरंदर - ११ हजार ८५०, शिरूर- ०, वेल्हा- ०एकूण : २ लाख ६९ हजार ३३७
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी --५६,८७० --४८,२४५
फ्रंटलाइन वर्कर्स --१,२६,४३२ --१,००,९०५
१८ ते ४४ वयोगट --१९,३१,१४९ --१०,५४,०७९
४५ ते ५९वयोगट --७,९४,८४२ --५,३७,३४५
६० पेक्षा जास्त --५,९३,७४८ --४,१२,७६६
एकूण --३५,०३,०४१ --२,१५,३४०
४) ४० हजार जणांना कोरोना
- आतापर्यंत एकूण बाधित - २,९१,०१६
- सध्या उपचार घेत असलेले -४६१
- कोरोना बळी - ४७१४
या दोन तालुक्यांत चिंता
जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या व कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या बारामती तालुक्यात आजही तब्बल सत्तर हजारपेक्षा अधिक लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. दौंड तालुक्यातदेखील ५० हजार ७६२ लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. यामुळे भविष्यात या तालुक्यातील लोकांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो.