
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करंजेपुल येथे धरणे आंदोलन; सदावर्ते यांना बारामती तालुक्यात प्रवेश करू देणार नाही
Monday, April 11, 2022
Edit
सोमेश्वरनगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करंजेपुल (ता. बारामती) येथील मुख्य चौकात नीरा-बारामती रस्त्यावर धरणे आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रमाकांत गायकवाड, माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, सुचिता साळवे, सोरटेवाडीचे सरपंच दत्ता शेंडकर, सोमेश्वरचे संचालक प्रवीण कांबळे, अजिंक्य सावंत, अनिल गायकवाड, तुषार सकुंडे, प्रदीप कणसे, प्रदीप मांगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी इंडियन बुलीयन ज्वेलर्सचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर म्हणाले, राज्याला शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा असून ती यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांनी पुढे नेली. त्यांच्याच विरोधात कट कारस्थान रचले असून त्यातील सूत्रधार शोधून करावाई करावी.
सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड यांनी, १२ तारखेस बारामतीतील घरावर हल्ला करण्याची भाषा करणारांनी हल्ल्याचा विचार सोडावा. फक्त तालुक्यात प्रवेश करून दाखवावा. ज्येष्ठ लोकांनी आम्हा युवकांना अडवू नये, असे आव्हान दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. त्यामुळे सदावर्ते यांना बारामती तालुक्यात प्रवेश करू देणार नाही अशी सिंह गर्जना प्रदीप मांगडे यांनी केली
एसटी कामगार विकास सावंत यांनी इतक्या वरिष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला केल्याबद्दल निषेध व्यक्त केला.
वाघळवाडीचे सदस्य हेमंत गायकवाड यांनी, हा केवळ साहेबांवर नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. या हल्ल्या मागील मूळ शोधून कारवाई व्हावी असे मत मांडले