-->
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मयुरेश्वर मोरगाव येथे भाविकांची मांदियाळी

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मयुरेश्वर मोरगाव येथे भाविकांची मांदियाळी

मोरगाव: अष्टविनायक आराध्यदैवत मोरगाव ता. बारामती येथे आज आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी मयुरेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दिवसभरात सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींनी मयुरेश्वराची प्रक्षाळ पूजा केली. यानंतर सर्व गणेश भक्तांना मयुरेश्वर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे सालकरी ढेरे यांनी मयुरेश्वराची पूजा केली व नैवेद्य दाखवला. सकाळी सात  वाजलेपासूनच सुरू असलेल्या गर्दीचा ओघ वाढतच गेला. दुपारी बाराच्या दरम्यान श्रींची पूजा  केल्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर देवस्थानच्यावतीने सुरू असणारा  खिचडीचा महाप्रसादाचे गणेश भक्तांना वाटप केले. याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.
 दिवसभर गर्दीचा ओघ वाढतच चालला होता. आज चतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेतील सर्व दुकाने हार, पेढे, मोदक , श्रींच्या प्रतिमा,  लहान मुलांची खेळणी, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने यांनी सजवली होती. रात्री चंद्रोदयापर्यंत गर्दी सुरू होती. चिंचवड देवस्थानच्या वतीने आज होणारी गर्दी लक्षात घेता भावीकांसाठी दर्शनरांग,  पिण्याचे पाणी, मंदिर स्वच्छता,  सफाई कामगार , सुरक्षा रक्षक यांची जय्यत तयारी केली होती. ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने सरपंच निलेश केदारी यांनी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था, परिसर स्वच्छता,  भाविकांसाठी पिण्याचे पाणी यांची सोय केली होती.

 आज पुणे, सातारा,  सांगली,  सोलापूर,  कोल्हापूर, ठाणे,  उस्मानाबाद,  अहमदनगर, सांगोला अशा विविध जिल्ह्यातून गणेशभक्त दर्शनासाठी आले होते. अनेक भाविक  नियमित संकष्टी चतुर्थीच्या वारी निमित्ताने येत असूनही अतिवृष्टी  ठिकाणच्या जिल्ह्यातूनही अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. सायंकाळी पाच नंतर गर्दीचा ओघ वाढत चालला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी पर्यंत सुमारे पन्नास हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी आरतीनंतर मयुरेश्वरास महानैवेद्य दाखवण्यात मला यावेळी प्रसंगी असंख्य भाविक उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article