
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मोरगाव येथे मुक्त द्वार दर्शनास भाविकांची गर्दी
Monday, August 29, 2022
Edit
मोरगांव: अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज मुक्त द्वार दर्शन व द्वार निमित्ताने राज्यभरातील मयुरेश्वर दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली होती. आज द्वार यात्रेचा अर्थद्वार हा दुसरा टप्पा संपन्न झाला असून मयुरेश्वरास जलस्नान व अभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव काल दिनांक 28 पासून सुरू झाला आहे.काल द्वार यात्रेचा धर्मद्वार तर आज अर्थद्वार हा दुसरा टप्पा संपन्न झाला. आज मुक्त द्वार दर्शनाचा दुसरा दिवस असल्याने गणेश भक्त कऱ्हा नदी किनारी असलेल्या गणेश कुंडामध्ये आंघोळ करून कुंडातील पाणी घेऊन श्रींस जलस्नान घालत होते . आज पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा खुला करण्यात आला. यानंतर सात वाजता सालकरी ढेरे यांनी पूजा केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता. अनेक भाविकांनी आज मूर्ती जलस्नान घालण्याची पर्वणीचा लाभ घेतला.
दुपारी दोन वाजता मयुरेश्वरास नैवेद्य दाखवण्यात आला. तर तीन नंतर मयुरेश्वरास हिरे, माणिक,मोती, युक्त भरजडीत अलंकार युक्त पोषक चढवण्यात आला. सुमारे तीन तास हा पोषक चढवण्याचे काम सुरू होते. यानंतर अलंकारयुक्त पोशाख पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उद्या मंगळवार दि. 29 रोजी मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखीचे चिंचवड येथून मोरगाव येथे सायंकाळी सात वाजता आगमन होणार आहे.