करावे तसे भरावे, पवारांवर शालिनी ताईंची तोफ
'करावे तसे भरावे', अशा शब्दात दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी ताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. ४१ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची त्यांनी पवारांना आठवण करुन दिली. अजित पवारांनी भाजपसोबत जाणं हा पवारांसाठी धडा होता, १९७८ ला पवारांनी जे केलं तो विश्वासघात आणि पाठिंत खंजीर खुपसण्यासारखं होतं, असंही शालिनी पाटील म्हणाल्या.
शरद पवार शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच अजित पवार यांनी गटनेता म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी त्यांच्याकडे असलेलं आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रही राज्यपालांना दिलं आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पवार कुटुंबात फूट आणि पक्षात बंडखोरी झाली असल्याचं समोर आलं. कारण, काही आमदार पवारांसोबत, तर काही आमदार अजित पवारांसोबत होते.
1998 ला काय झालं होतं?
१९७८ ला वसंत दादा पाटील यांना धक्का देत शरद पवार वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (एस) ला ६९, तर काँग्रेस (आय) ला ६५ जागांवर विजय मिळाला. जनता पक्षाने ९९ जागा मिळवल्या. काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. एस गटाचे वसंत दादा पाटील मुख्यमंत्री, तर आय गटाचे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री बनले. पण नंतर शरद पवार यांनी ३८ आमदार फोडून जनता पक्षाला समर्थन दिलं आणि स्वत: मुख्यमंत्री बनले. सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरलेल्या पवारांचं सरकार दोन वर्ष चाललं.
अजित पवारांनी जे केलं त्याला १९७८ च्या घटनेची पुनरावृत्ती म्हणून पाहिलं जात आहे. पण यातही मत-मतांतरे आहेत. कारण, अजित पवारांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजघडीला त्यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अजूनही स्पष्ट नाही.