मी उपमुख्यमंत्री व्हावे ही तर कार्यकर्त्यांची इच्छा : अजित पवार
बारामती : कार्यकर्त्यांना वाटते मीच उपमुख्यमंत्री व्हावे. पण ते ठरविण्याचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. खाते वाटपाबाबत मुख्यमंत्रीच अधिक विस्ताराने सांगू शकतील, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामे आहेत, त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, बारामती मतदारसंघांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे पहिले काम आहे. तेच मी करतो. बारामतीकरांनी १ लाख ६५ हजारांचे मताधिक्य देऊन जबाबदारी सोपविली आहे.
- फडणवीसांबरोबर हवा पाण्याच्या गप्पा : अजित पवार
सोलापुर जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बराच वेळ शेजारी बसून संवाद साधत होते. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले की, मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही शेजारी बसून हवा-पाण्याच्याच गप्पा मारल्यात. शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालंय अस समजण्याचे कारण नाही. राजकीय व्यक्ती कधी कायमच्या एकमेकांच्या दुश्मन नसतात. सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसर काहीही नव्हते. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला व इतरांना बोलावले होते. त्यामुळे त्या लग्नाला आम्ही गेलो होतो. खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र यांची खुर्ची शेजारी शेजारी आली इतकेच.त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली, कस काय पाऊसपाणी वगेरे.