अजित पवारांच्या रडारवर पुण्यातले कोणते आधिकारी ?
पुणे : सत्ताधाऱ्यांना खूष ठेवणारे आणि राजकीय सुडापोटी तेव्हाच्या विरोधकांना म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जाच केलेल्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवे सरकार बदलीची शिक्षा देण्याच्या विचारात आहे. खासदार-आमदारांना न जुमानलेल्या पुण्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात दिले. पवार यांच्या रडावर कोणकोणते अधिकारी येणार ? याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्ता नाट्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी मोकळा संवाद साधला. आपल्या भाषणातून थेट प्रश्न विचारत दादांनी कार्यकर्त्यांना बोलते केले. तेव्हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही उल्लेख केला.
तेव्हा, एक अनुभव सांगता अजित पवार म्हणाले, " एका लोकप्रतिनिधीला अटक केल्यानंतर कोणताही गुन्हा नसताना त्याच्या कुटुंबियानांही कायद्याचा धाक दाखवत अटक करण्याची धमकी या आधिकाऱ्यांने दिली. अशा आधिकाऱ्यांना मग तो कितीही मोठा असो, त्याची गय करणार नाही.''
गेल्या पाच वर्षात पोलीस आधिकाऱ्यांशिवाय महसूल विभागातील अनेक आधिकाऱ्यांनीदेखील असहकाराची भूमिका घेतली होती. यांच्यापैकी कालमर्यादेच्या अधीन राहून ज्यांच्या बदल्या करता येणे शक्य आहे, अशा सर्वांना पुण्याबाहेर पाठविण्याचा जणू संकल्पच अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तसेच गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांना असहकार करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या आधिकाऱ्यांची बदली निश्चितपणे केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.