राज्यमार्ग सापडला अनधिकृत होर्डिंग्सच्या विळख्यात
Tuesday, December 3, 2019
Edit
बारामती : प्रतिनिधी
निरा - बारामती हा राज्यमार्ग अनधिकृत होर्डिंग्सच्या विळख्यात सापडला असून शासनाच्या सर्वच विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जाहीरातदारांचे चांगलेच फावले आहे. शासकीय मालकीच्या यंत्रणाच्या विद्रूपीकरण करण्याचा काहींनी सपाटाच लावला असून यावर नियंत्रण नसल्याने हा मार्ग म्हणजे कोणीही या आणि जाहिराती लावा असा बनला आहे.
निरा बारामती या ४० किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर सध्या व्यवसायाच्या जाहिराती करण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. एकाने चार दोन होर्डिंग्स लावले तर दुसरा पाच दहा होर्डिंग्स सहज लावतो. यामध्ये कहर म्हणजे रस्त्यावरील झाडांना खीळे ठोकून काहींनी आपल्या जाहिराती त्यावर लावल्या आहेत. बीएसएनएलचे खांब, विद्युत वितरणचे खांब, रस्त्यालगत असलेली झाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जागा तसेच रस्त्याच्या आजूबाजूला असलेले दिशादर्शक फलकावरही अवैध प्रकारे जाहिराती लावण्यात येत आहेत. सोमेश्वर कारखाना परीसरात असलेल्या कारखान्याच्या मालकीच्या झाडांवरही आणि मुख्य चौकात काहींनी आपल्या व्यवसायाच्या विना परवाना जाहिराती लावल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर विविध प्रकारचे दिशादर्शक फलक लावत असते. यामध्ये जवळ असलेल्या शाळा, धोकादायक वळणे, रिप्लेक्टर, गाव आणि तालुक्याचे अंतर, विविध प्रकारचे सूचनाफलक वाहन चालकांच्या माहितीसाठी बसविले जातात. मात्र बारामती सह बाहेरील तालुक्यातील व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे शासनाच्या यंत्रणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत होर्डिंग्स लावत आहेत. रस्त्यालगत असलेल्या ग्रामपंचायती याबाबत काहीही बोलत नसल्याने अशा व्यवसायिकांची फुकटात जाहिराती होत आहेत. मात्र शासनाच्या मालमत्तेचे होणाऱ्या नुकसानीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, बीएसएनएल, महावितरण यांचे अधिकारी आणि कर्मचारी याविषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीत परीणामी जाहिरात दारांचे चांगलेच पावत असून त्यांना त्यावर कोणताही खर्च करावा लागत नाही. यांना शासनाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य असण्याची शक्यता असून याविषयावर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अन्यथा हा रस्ता म्हणजे आओ जाओ घर ततुम्हारा असा होण्यास वेळ लागणार नाही.
निरा बारामती रस्त्यावर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक उभे आहेत. त्यांच्या आधारावर अथवा त्याच्या बाजूला मंडळे, दुकाने, खाजगी क्लासेस, एमएससीआयटी, शैक्षणिक संस्था, फायनान्स कंपन्या, ट्रक्टर व दुचाकी शोरुम, हॉस्पिटल आदींच्या जाहिरातींचा उच्चांक झाला असून संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र कोमात गेले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. झाडांना इजा पोहचवून आणि पर्यावरणाचा कोणताही विचार न करता त्यावर आपल्या व्यवसायाच्या जाहिराती चिटकवणे चुकीचे असून यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
छायाचित्र : निरा - बारामती या राज्य मार्गावर अनधिकृतपणे होर्डिंग्सची संख्या वाढली आहे.