-->
कुटुंबाचा असला तरी, अजितला किमंत मोजावी लागली हे दाखवून दिले – शरद पवार

कुटुंबाचा असला तरी, अजितला किमंत मोजावी लागली हे दाखवून दिले – शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या धोरणाशी विरोधी भूमिका घेत अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत शपथ घेतली. त्यानंतर तातडीने मी अजित पवारांच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही, हे सर्वात आधी स्पष्ट केले. त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार माझ्या घरी आले. त्या वेळी तुझी चूक झाली. त्याची तुला किंमत चुकवावी लागेल, असे त्याला स्पष्ट बजावले, आणि कुटुंबाचा असला तरी, त्याला केलेल्या कृत्याची किंमत मोजावी लागली हे सगळ्यांना दाखवून दिले. अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.


                 यावेळी ते म्हणाले की, राज्यात सत्ता स्थापनेआधी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्याच्या दिसून आल्या. `पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेतली तर त्या चुकीला माफी करायची नाही, हे मी आधीच ठरवलं होतं. मात्र अजित पवार यांनी अचानक पहाटे जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मला सकाळी सहा वाजता एकाने फोनवरून सांगितले. मी टिव्ही लावला. माझा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर तातडीने मी अजित पवारांच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही, हे सर्वात आधी स्पष्ट केले. शपथ घेतली त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार माझ्या घरी आले. माझी चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चुकीची किंमत तुला मोजावी, लागेल असे मी तेव्हा बजावले होते. आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागली आहे. पक्षाच्या धोरणाशी विसंगत धोरण घरातल्या मंडळीने घेतले तरी त्याला माफ केले जात नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.


             अजित पवार यांना भविष्यात मंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. पक्षाचे कार्यकर्ते, विधीमंडळ सदस्य, नेते यांना अजित पवार सरकारमध्ये हवेत. त्यांच्याशिवाय सरकारचा कारभार चालविणे अवघड होईल, असे त्यांचे मत आहे. मात्र खुद्द अजित पवार यांनीच आपल्या कृतीमुळे तयार झालेले वातावरण स्वच्छ होईपर्यंत सरकारमध्ये सामील न होण्याचे ठरविले असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले. अजितदादांचे मन वळविण्यात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांचाही सहभाग होता का, या प्रश्नालाही शरद पवारांनी नकारार्थी उत्तर दिले. पवारांच्या या भूमिकेमुळे अजितदादा यांना लगेच मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.


 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article