
थोपटेवाडी गावात सोशल मीडियावर निवडणूक धुमसान, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरू
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावात तोंडावर येऊन ठेपलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोशल मीडियावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू झाल्या आहेत.
मागील काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत वार्डनिहाय सदस्य आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून गावात सोशल मीडियावर वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच विरोधी गटाकडून 06/02/2020 रोजीच्या ग्रामसभेमधून सरपंच व ग्रामसेवक यांनी सभेमधून पलायन करून दडपशाहीने काम करत असल्याचा ठपका गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर सत्ताधारी गटाकडून विरोधकांनी खोट्या सह्या घेतल्याचा आरोप पत्राद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे.
थोपटेवाडी गावच्या इलेक्शनची आचारसंहिता येत्या दोन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. यावेळी दोन्ही गटाकडून खंबीर उमेदवार निवडणुकीला एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार असल्याची दाट शक्यता आहे. एकंदर दोन्ही गट एकमेकांवर चिखलफेक करायला कमी पडत नसल्याचे चित्र आहे. आगामी होणाऱ्या इलेक्शन मध्ये कोणता गट बाजी मारतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.