
युक्तिवादात शरद पवारांचं नाव आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पिठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. दरम्यान काल (सोमवारी) याच प्रकरणातील सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतल्याने न्यायालयानं त्यांना चांगलंच फटकारलं.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडताना एका मोठ्या नेत्याच्या मुलीने आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिल्याचं सांगत शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केला. यावर न्यायालयाने संताप व्यक्त करताना, राजकीय नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला जाऊ नये अन्यथा युक्तिवाद करण्याची परवानगी नाकारली जाईल अशा शब्दांमध्ये फटकारले. यावेळी न्यायालयाने, आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सुनावणी करणार असल्याचं देखील सांगितलं.
मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर
आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १७ मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल असं सांगितल्याने मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी “मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर” येथे क्लिक करा.