बारामती ; आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह; धोका अजून टळलेला नाही
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील आणखी एकजण कोरोनाग्रस्त झाला असल्याचे आज (दि. १२) स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली आहे. दरम्यान माळेगाव बुद्रूकमधील हा दुसरा रुग्ण आहे. यापूर्वी येथील एका ज्येष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेला हा रुग्ण पुण्यात महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करतो. ८ मे रोजी तो घरी आला होता.
दरम्यान या रुग्णाच्या निकट असलेल्या भवानी पेठेतील एका मित्राला कोरोना झाल्याचे ५ मे रोजी स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आल्याची या रुग्णाला पूर्ण कल्पना होती. त्याने माळेगावमध्ये आल्यानंतर तात्काळ ही बाब प्रशासनाला सांगितली. त्यामुळे प्रशासनाने त्याचे विलगीकरण करत घशातील स्वॅब तपासणीसाठी घेतला. या तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. माळेगावमधील हा दुसरा रुग्ण आहे. यापूर्वी माळेगावातील लकडेनगर भागातील एका ज्येष्ठाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. बारामती तालुक्यात कोरोनाची साखळी तुटण्याची स्थिती असताना हा रुग्ण सापडला. तालुक्यातील हा दहावा रुग्ण आहे.
दरम्यान सध्या या रुग्णासह कटफळ येथील ज्येष्ठ व्यक्ती असे दोन कोरोना संक्रमित तालुक्यात आहेत. दोघांचा यापूर्वी मूत्यू झाला आहे. तर अन्य आठजण कोरोनामुक्त झाले आहेत.
माळेगाव प्रतिबंधित क्षेत्र
या रुग्णाचा अहवाल कोरोना संक्रमित आल्याने माळेगाव बुद्रूकची महसूली सीमा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतूकीस बंदी घालण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.