
बारामती ; 16 पासून काय चालू काय बंद
बारामती शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तीन टप्प्यात हा लॉकडाऊन असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच दि. १६ ते १९ जुलै या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहतील. तर दि. २० जुलै ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरात गेल्या काही दिवसांत कोरोंनाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. अचानकपणे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारपासून शहरात संपूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तीन टप्प्यात हा लॉकडाऊन राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शहरात लागू करावयाच्या लॉकडाऊनसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.
गुरुवार दि. १६ ते १९ जुलै या कालावधीत शहरातील वैद्यकीय सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत. त्यानंतर तर दि. २० जुलै ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. हाच नियम भाजीपाला, फळे, मांस, मासे विक्री करणाऱ्या दुकानांसाठी लागू असणार आहे. तर शहरातील पेट्रोलपंपही सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. या कालावधीत दूध आणि पाणी पुरवठा मात्र कायम सुरू राहणार आहे.
शहरात मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकवरही निर्बंध लावण्यात आले असून ६५ वर्षांवरील व्यक्ती, विविध आजाराने त्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांखालील मुले यांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. सर्व खासगी बांधकाम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व मंगल कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन खाद्य सुविधाही १६ ते १९ जुलैदरम्यान बंद ठेवली जाणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.