बारामतीत काल सापडलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह
बारामती शहरात काल आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणि काही लक्षणे आढळलेल्या अशा २४ जणांच्या घशातील द्राव्याचे नमुने तपासण्यात आले होते त्यामधील सर्वजण निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दुसरीकडे, आजही काही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवालही लवकरच हाती येतील असेही डॉ. खोमणे यांनी सांगितले.
बारामतीत काल दिवसभरात पाचजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर लक्षणे आढळलेल्या २४ जणांची तपासणी आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामध्ये २४ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आजही नव्याने वेगवेगळ्या लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीत मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून गुरुवारपासून संपूर्ण बारामती शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे शहरातच कोरोना चाचणी आणि उपचाराची सोय झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाला अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता जास्तीत जास्त व्यक्तींची तपासणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत.