बारामतीबद्दल चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य धादांत खोटे : सभापती अनिल खलाटे
बारामती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती बाजार समितीमार्फत समितीच्या बाहेर शेतक-यांकडून सेस गोळा केला जातो हे वक्तव्य केले होते, सदरचे वक्तव्य धादांत खोटे असून, राजकीय दृष्टया केलेले आहे, असा खुलासा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व उपसभापती बाळासाहेब पोमणे यांनी केला.
बारामतीच्या बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेली अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामती बाजार समितीबाबत केलेल्या विधानाचे आज पडसाद उमटले व आज बाजार समितीने पाटील यांचे वक्तव्य खोटे असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे नमूद केले.
चंद्रकात पाटील यांनी केडगाव ते चौफुला या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या सभेत हे वक्तव्य केले होते. या बाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खलाटे व पोमणे यांनी नमूद केले आहे की, बारामती बाजार समिती आवाराबाहेर शेतकरी किंवा व्यापा-यांकडून कसलाही मार्केट सेस वसूल करीत नाही, किंवा तसे काही परित्रकही काढले नाही. उलट ही बाजारसमिती शेतक-यांच्या हितासाठीच सातत्याने कार्यरत असते. समितीत शेतक-यांसाठी विविध सुविधा निर्माण करुन दिल्या आहेत.
बाजार आवारात व्यापार वाढविणे, खरेदीदारात स्पर्धा वाढून शेतक-यांना स्पर्धात्मक दर मिळणे, अचूक वजनमाप, त्याच दिवशी शेतक-यांना पट्टी, लिलावापूर्वी शेतमालाचे वजन, ऑनलाईन लिलावपध्दतीद्वारे ई ऑक्शन प्रणाली, रेशीम कोष खुली बाजारपेठ खरेदी विक्री केंद्र या बाबी बाजार समितीने राबविल्या आहेत.
या शिवाय इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, आधुनिक सुसज्ज जनावर बाजार, श्रमजीवीसाठी हमाल भवन, भव्य सेल हॉल, निर्यात सुविधा केंद्र यासह अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे, असेही सभापती उपसभापती यांनी नमूद केले आहे.