काऱ्हाटी, कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी काढला पळ
बारामती/ प्रतिनिधी : का-हाटी येथे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांचा ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे ग्रामस्थांनी पाठलाग केला असता अंधाराचा फायदा उठवत उसातून पळ काढला आहे. तर चोरट्यांनी दुचाकी जागीच टाकून देत उसातून पळ काढला. यावेळी त्यांची दुचाकी वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे चोरट्यांचा लुटमारीचा डाव अखेर फसला असून नागरिकांच्या सतर्कतेचा त्यांना सामना करावा लागला आहे
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२ वाजण्याच्या सुमारास का-हाटी गावातील दुचाकीवरून चालेल्या एकाला अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या व्यक्तीने बारामती तालुका पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली. सोमवार (दि.२६) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना दोन इसम दुचाकीवरून कोयत्याचा धाक दाखवून लोकांना धमकावून वेगाने गाडी चालवत जळगाव क.प, कर्हावागज, का-हाटी गावाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी तातडीने विलंब न करता ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन 18002703600 या क्रमांकावरून कॉल देऊन गावांना कळवत सतर्क केले. यावेळी गावातील सर्व नागरिक चोरटे आले असल्याच्या कॉल नंतर सतर्क झाले. दरम्यान २ चोरटे कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करत होते. त्या दोन चोरट्यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांनी सावधानता बाळगत आरोपींचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना चोरटे मात्र, अंधारात उसाचा फायदा घेत फरार झाले. यावेळी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दुचाकी ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरु आहे. तर ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे तालुक्यातील हि दुसरी घटना उघडकीस आली आहे.