उपमुख्यमंत्री अजित पवारांची खोटी सही करून फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत एकावर गुन्हा दाखल
कोऱ्हाळे बु - मी अजितदादांच्या कार्यालयातून बोलत असून दादांकडे तुमच्याविरोधात तक्रार आली आहे, मी तुम्हास व्हाटसअपवर ही तक्रार पाठवली आहे असे सांगत मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तुषार तावरे ( रा. तारांगण सोसायटी, बारामती) याच्यावर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे, या आरोपीने आणखीही कोणाची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. बारामतीत हा प्रकार घडल्याने व एखाद्याचे धाडस झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यासंदजर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील अजय कामगार या बांधकाम व्यावसायिकास उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलत असून तक्रार आल्याचे सांगितले. ती तक्रार पाहिल्यानंतर त्या तक्रारीवर उपमुख्यमंत्री यांच्या सहीने संबंधितांवर कारवाई करावी असा शेरा होता. कामदार या घटनेने घाबरून गेले, त्यांनी तुषार तावरे याच्याशी संपर्क साधला असता त्याने ही तक्रार उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवली, पोलिस आयुक्तांकडे पाठवली नाही असे सांगत त्या तक्रारीतील अर्जदाराबरोबर असलेले वाद लगेच मिटवा, अन्यथा तुमच्याविरोधात कारवाई होईल असे सांगितले.
कामदार यांना थोडी शंका आल्याने त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र तुषार तावरे नावाची व्यक्ती आमच्या कार्यालयात नसल्याचे थेट अजितदादांशी संपर्क साधून माहिती द्या असे कळवले. त्यावर कामदार यांनी अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. या घटनेत गांभिर्य दिसून आल्याने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर अजय कामदार यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तुषार तावरे याच्याविरोधात फसवणूक, तोतयेगिरीचा गुन्हा दाखल केला. तुषार तावरे याने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.