वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवला
पुणे जिल्हय़ातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्हय़ातील खंडाळा, फलटण तसेच पुढे सोलापूर जिल्ह्याला वरदायनी असलेल्या नीरा नदीत आज दि. १४ रोजी वीर धरणातुन १४ हजार ५११ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. भोर - वेल्हा तालुक्यातील नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या भाटघर, नीरादेवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीर सह सर्व धरणे १०० टक्के भरले असून आज सकाळी आठ वाजल्यापासून वीर धरणातून ४ हजार ६३७ क्युसेक्स वेगाने नीरा नदी पत्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. तर दुपार नंतर १४ हजार ५११ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. नीरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदीकाठच्या शेतीला फायदा होणार असून या नदीकाठच्या शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नीरेतील प्रसिद्ध दत्तघाटाच्या पाय-यांना पाणी लागले आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गोधड्या धुन्यासाठी या परिसरात लोक सहकुटुंब आले होते, पावासने घोधड्या वाळवण्याची मोठी कसरत होत असताना आता नदिची पाणीपातळी वाढत असल्याने लोकांची त्रिधा होत आहे.